छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण जगात उत्साहाने साजरी होते आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने हा दिवस साजरा करत असतो. तसेच कलाकरांसाठी हा दिवस लक्षणीय ठरतो, ते शिवकालीन भूमिकेत जगता आले तर. अभिनेत्री उर्मिला जगतापने नुकतेच जय भवानी जय शिवाजी या मालिकेत, महाराणी सोयराबाई यांची भूमिका साकारली होती. शिवजयंती निमित्ताने उर्मिलाने आपल्या आठवणी जाग्या केल्या. उर्मिला आपल्या भूमिकेबद्दल सांगते.
“संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल लहानपणापासून ऐकत असतो, वाचत असतो. त्यांच्या पुढे आपण नेहमीच नतमस्तक होतो. पण शिवकालीन भूमिका मिळावी ही प्रत्येक मराठी कलाकाराची इच्छा असते आणि माझ्या वाट्याला करिअरच्या एवढ्या लवकर इतक्या मोठ्या भूमिकेची संधी चालून आली हे माझं भाग्य…
नुकत्याच संपलेल्या ‘जय भवानी जय शिवाजी’ या स्टार प्रवाहच्या मालिकेत सोयराबाईसाहेबांच्या भूमिकेसाठी जेव्हा निवड झाली तेव्हा मला खूपच आनंद झाला. ही मालिका शिवाजी महाराजांच्या शिलेदारांवर होती. त्यामुळे माझ्या वाट्याला आलेली भूमिका ही छोटी होती.
भूमिकेची तयारी करताना आपण कसे दिसून, आपल्याला नीट संवाद म्हणता येतील ना याची भीती होती. त्यासाठी मी मेहनत घेतली. छोट्या भूमिकेतही आपण कसे उठून दिसू यासाठी मी प्रयत्न केला. या मालिकेतून मला शिवाजी महाराजांबद्दल अधिक जवळून जाणता आलं. महाराणी सोयराबाई यांच्या भूमिकेच्याही विविध छटा आहेत. त्या दाखवण्याचं चॅलेंजही होते.
शिवाजी महाराजांच राजे म्हणून कसे होते, त्यांचे शिलेदारांवरचा विश्वास हे सर्व जाणून घेताना ऊर आणखी भरुन येत होता. पत्नीसोबतचे त्यांचे नाते, राजकारणावर होणारी चर्चा यामुळे इतिहास अनुभवता आला. माझ्यासाठी ही मालिका खूप काही शिकवून देणारी ठरली. यानंतर शिवचरित्राबद्दल आणखीन जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. शिवचरित्र प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी देऊन जाते. या मालिकेमुळे मात्र माझ्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल धडून आला.
जेजुरी जवळच्या खेड्यातून आलेली अभिनेत्री उर्मिला जगताप प्रायोगिक नाटक, मालिका, म्युझिक अल्बम असा प्रवास केला आहे. त्याचप्रमाणे तिचा ‘रौद्र’ नावाचा सिनेमाही लवकरच भेटीला येणार आहे.
Article Link – https://pudhari.news/amp/story/soneri/positive-change-in-my-personality-said-actress-urmila-jagtap